सोन्याच्या दरात झाली 5,230 रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर
गेल्या काही दिवसांमध्ये सोनं आणि चांदीचे दर खूपच वाढले आहेत. या वाढीमागे काही खास कारणं आहेत.
सध्या जगभरात काही देशांमध्ये व्यापारासंदर्भात वाद सुरू आहेत. यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. याच कारणामुळे लोकांनी सोन्यात जास्त पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीसाठी ओळखलं जातं. म्हणजेच, सोन्यात पैसे टाकले तर ते सुरक्षित राहतात आणि वेळोवेळी त्याची किंमत वाढते.
सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ
गेल्या एका वर्षात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किंमतीत 22,360 रुपयांची वाढ झाली आहे. फक्त तीन दिवसांतच सोनं तब्बल 5,230 रुपयांनी वाढून 95,670 रुपयांवर पोहोचलं आहे.
8 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 89,730 रुपये होता. 22 कॅरेट सोनं, जे दागिने बनवायला वापरलं जातं, त्याचा भाव 82,250 रुपये होता.
10 एप्रिलला सोन्याचा भाव 2,940 रुपयांनी वाढून 93,380 रुपये झाला. पुढच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिलला 2,020 रुपयांची वाढ झाली आणि सोन्याचा भाव 95,400 रुपये झाला. 12 एप्रिलला आणखी 270 रुपयांनी वाढ होऊन 95,670 रुपये झाला.
22 कॅरेट सोनंही वाढलं. गुरुवारी ते 2,700 रुपयांनी वाढून 85,600 रुपये झालं. शुक्रवारी 1,850 रुपयांची वाढ होऊन ते 87,450 रुपये झाले आणि शनिवारी आणखी 250 रुपयांनी वाढून 87,700 रुपये झाले.
चांदीही झाली महागडी
फक्त सोनंच नाही तर चांदीचाही भाव वाढलाय. शुक्रवारी चांदीचा 1 किलो भाव 100 रुपयांनी वाढून 97,100 रुपये झाला. पण शनिवारी चक्क 2,900 रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा दर 1 लाख रुपये किलोपर्यंत पोहोचला.
फक्त तीन दिवसांतच चांदी 7,000 रुपयांनी महाग झाली आहे.